डॉ. कलाम यांच्याविषयी माझ्या भावना
माणूस जन्मास येतो. माणूस एके दिवशी मरून जातो. माणसाचं आयुष्य हे असं दोन वाक्यांत सुरु करून संपवता हि येतं. आणि हे केवळ मला, तुम्हालाच नाही तर प्रत्येकास लागू पडतं. कारण जन्माला येणे आणि देहावसान होणे अजूनतरी कोणत्याही सजीवास चुकलेले नाही आणि नजीकच्या काळात तशी शक्यताही नाही. पण काही माणसे मात्र एवढी कर्तुत्ववान असतात कि या दोन वाक्यात कितीही वाक्ये लिहिली तरीही ती अपुरी वाटावीत. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या देहावसानानंतर याची खात्री पटते. डॉ.कलम यांच्या निधनाने सर्व भारतीयांवर शोककळा पसरली. प्रत्येक जण आपापल्या परीने त्यांना श्रद्धांजली वाहू लागला. सोशल नेट्वर्किंग साईट्स वरून आणि इतर माध्यमातून याचा प्रत्यय कोणासही यावा. पण या सर्व जणांमध्ये एकानेही त्यांच्याविषयी अनुद्गार काढल्याचे दिसत नाहीत. उलट त्यांच्याविषयी वाटणारे प्रेम सर्वत्र दिसते. प्रत्येक जण आपापल्या परीने त्यांना आपल्या मनात साठवू पाहताना दिसला. भारताला शस्त्रसुसज्ज बनवण्यात डॉ.कलामांनी सिंहाचा वाटा उचलला. अहिंसावादी होते तरीही शस्त्र आणि देशाच्या संरक्षणासाठीचे त्याचे महत्व त्यांनी ओळखले होते. अर्थात सर्व काही त्यां...