मला भावलेले पुस्तक 'टाटायन'.

मी तसा पुस्तकांचा चाहता आहे. त्यामुळे वाचन हे सतत चालू असतं. नुकतंच वाचनात आलेले पुस्तक म्हणजे ‘ टाटायन ‘ होय. टाटा कुटुंबीय आणि टाटा समूह हा या पुस्तकाचा मध्यवर्ती विषय. लोकसत्ताचे सध्याचे संपादक आणि सिद्धहस्त लेखक श्री. गिरीश कुबेर यांनी याचे लेखन केले आहे. त्यांच्या इतर सुप्रसिद्ध पुस्तकांप्रमाणेच हे पुस्तकही वाचकांना खिळवून ठेवते. ओघवत्या भाषेमुळे हे पुस्तक एका बैठकीत पूर्ण करावे असेच वाटते. पण टाटा या आडनावाभोवती फिरणारा इतिहास आणि वर्तमान काळ काही थोडा थोडका नाही. त्यामुळे इच्छा असूनही काही दिवस लागतातच. पण त्यातही आनंद मिळतोच. कारण मिठाई एकदम खा किंवा थोडी थोडी. तिचा गोडवा कायम असतो.
आता हे पुस्तक आपल्याला काय देतं, असा विचार केला तर उत्तर येतं, बरच काही. पण त्यातील मला भावलेल्या आणि महत्वाच्या काही गोष्टी खालील प्रमाणे. अर्थात हि समीक्षा नव्हे हे लक्षात असू द्या. हि आहे एका वाचकाची पावती. 

पहिली गोष्ट हे पुस्तक शिकवतं, ते म्हणजे तुमची घरची पार्श्वभूमी कशीही असो, जर स्वतः वर विश्वास असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश, पैसा, प्रसिद्धी आपल्या समोर हात जोडून उभे राहतात. 

दुसरी गोष्ट अशी आपण शिकतो कि, व्यावसायिक-उद्योजक यांनी जगाचा ठाव घ्यायला हवा. जग हे आपलं कार्यक्षेत्र आहे असं ठरवलं तर तुमचा दृष्टीकोन विस्तारतो. त्यामुळे तुमच्याकडे येणारा पैशाचा ओघ वाढतो. त्याचबरोबर तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या, तुम्हाला उच्चस्थानी मानणाऱ्या इतर जणांना सुद्धा प्रगतीच्या अनेक वाटा चोखाळायला उर्मी मिळते. आणि हि उर्मीच नवीन उद्योजक घडवते. 

तिसरी गोष्ट आणि ती मला सर्वात महत्वाची वाटली ती म्हणजे पैसे आले कि आपली बुद्धी भ्रष्ट होते हा असलेला अतिशय कटू गैरसमज. टाटा परिवाराच्या इतिहासाकडे पाहिलं तर लक्ष्मी घरी पाणी भरत असूनही कर्मयोगी कसं राहता येतं ते कळतं. आणि हे केवळ पहिल्या दुसऱ्या पिढीने केलं आहे असं नाही तर प्रत्येक पिढीने केलं आहे हे पाहून सदर गैरसमज आपण सर्वांनीच मनातून काढून टाकायला हवा असं वाटतं. 

चौथी गोष्ट म्हणजे समाजसेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं हे यातून कळत. भारतातल्या अनेक अग्रगण्य संस्था या टाटा परिवाराने सुरु केल्या. आणि वेळ प्रसंगी सरकारलाही सुपूर्द केल्या. त्या संस्था आजही कार्यरत आहेत. उद्योजक आहोत म्हणून आपण समाजाचं देणं लागतो हि भावना त्यामागे दिसून येते. 

पाचवी गोष्ट म्हणजे बदलत्या काळासोबत आपणही बदलायला हवं. बदल हा मानवी आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने आपल्यात बदल करणे आवश्यक असते. जे करत नाहीत ते थांबतात आणि बाकीचे आयुष्यात पुढे जातात. टाटा समूहाच्या विविध संचालकांच्या कंपन्या चालवण्याच्या पद्धतीतून हे आपल्याला सतत जाणवत राहत. 

सहावी गोष्ट अशी कि, आपला कार्यकाळ संपत आला आहे असं वाटायला लागलं कि आपला सुयोग्य उत्तराधिकारी निवडणं महत्वाचे असते. याउलट अनेक जण आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्य ऐवजी आपल्या भूतकाळात रममाण होतात. परिणामी त्याचा त्रास आधी बाकीच्यांना होतो आणि नंतर अडेलतट्टू पणा करणाऱ्याला. पण या कुटुंबात आणि समुहात असे दिसून येत नाही. 

सातवी गोष्ट जाणवते ती म्हणजे त्रास सर्वांना सहन करावा लागतो. पण त्या परिस्थितीला सामोरे जाऊन आल्या अडचणीला नष्ट करणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट हवे. आलेल्या अडचणीमुळे उर बडवून रडत बसण्यात काहीच अर्थ नाही. 

आठवी गोष्ट म्हणजे आपलं उत्पादन हे सर्वोत्तम आणि ग्राहकोपयोगी असावं, या कडे प्रत्येक उद्योजकाने लक्ष देणे गरजेचे आहे. आपले ग्राहक समाजातील कोणत्याही स्तरातील असोत, त्यांच्या पर्यंत पोहोचणारे उत्पादन सर्वोत्तम असावे. ते तसे नसेल तर त्यात आवश्यक बदल करणे आपले कर्तव्य आहे हि भावना उद्योजकाच्या मनात असावी. 

नववी गोष्ट म्हणजे लक्ष्मी सरस्वती तुमच्या कुटुंबात वास करत असल्या तरीही आपलं वागणं साधं असावं. त्यात दिखाऊपणा नसावा. वेश साधा असला तरीही विचारसरणीसुद्धा उच्च असावी. ज्या व्यक्ती अथवा कुटुंबाकडे हे गुण असतात, त्यांच्या घरी सरस्वती आणि लक्ष्मी दोघीही सदैव वास करतात. 

टाटायन या पुस्तकातून जाणवलेल्या या ठळक गोष्टी. तुम्हालाही ते पुस्तक वाचून या जाणवतीलाच. किंबहुना या पेक्षा कित्येक सुंदर गोष्टी अनुभवास येतील. हे पुस्तकच असं आहे. तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला माझं म्हणणं पटेल. जर नसेल वाचलं तर ते पुस्तक वाचून तुम्हाला नक्कीच या लेखाची आठवण येईल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर या पुस्तकातून आणि लेखातून उर्जा प्राप्त झाली, एक उर्मी मिळाली आणि आयुष्यात उद्योगजगतात काही करू शकलात तर टाटा आणि कुबेर सर यांना धन्यवाद द्यायला विसरू नका.

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे

RESPONSIBLE MINDSET

करोना काल की छह सिंखे (मेरा पहला हिंदी ब्लॉग)