डॅन ब्राऊनच्या पुस्तकांविषयी बोलू काही...
डॅन ब्राउन. आजच्या काळातील आघाडीच्या
लेखकांपैकी एक. द दा विन्सी कोड, इन्फर्नो , एन्जेल्स अँड डेमन्स , द लॉस्ट
सिम्बॉल या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांबरोबरच इतर हि पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या
पुस्तकांच्या विषयामुळे आणि त्यातील माहितीमुळे काही पुस्तके वादाच्या
केंद्रस्थानी राहिली. पण यामुळे त्यांचे चाहते आणि विरोधक दोन्ही वाढले. परिणामी
डॅन ब्राऊन हे सतत चर्चेत राहिलेलं नाव आहे.
वर नमूद केलेली चारही पुस्तके हि वाचकांच्या
विशेष आवडीची आहेत कारण यातील नायक, रॉबर्ट लँगडन त्यांना भावतो. त्याचं
प्रतिकशास्त्रातील (Symbology) ज्ञान वादातीत आहेच पण आलेल्या परिस्थितीला धीराने
आणि समयसूचकता वापरून सामोरं जाण लोकांना भावत असावं. तसा तो जेम्स बॉंड नाही, पण
प्रत्येक कादंबरीत त्याला नाव नवीन स्त्री सहकारी गूढ रहस्यांची उकल करण्यास मदत
करतात. तो त्यांच्यात गुंततो पण अगदी काही काळासाठी आणि त्याचं नशीब प्रत्येक
वेळेस त्याला नवीन आव्हानांनसमोर आणून उभं करतं. आणि हा अगदी सामान्यातला नायक
बाह्या सरसावून उभा ठाकतो. आपली बुद्धिमत्ता वापरून समस्येचा पदाव करतो आणि शेवटी तुम्हा
आम्हाला विचार करण्यास खाद्य देऊन जातो.
या नायकाबरोबरच श्रेय जातं ते डॅन यांच्या
ओघवत्या, गूढ निर्माण करणाऱ्या आणि वाचकाला सतत धक्के देणाऱ्या शैलीला. त्यांच्या
पुस्तकात हमखास जाणवणारी एक गोष्ट म्हणजे एखादी व्यक्तिरेखा सर्व सामान्य वाटत
असताना, त्या व्यक्तिरेखेच वेगळेच पैलू वाचकांसमोर आणणं. म्हणजेच एखाद्या
वाचकप्रिय व्यक्तिरेखेचे खलनायीकी स्वरूपात प्रकटीकरण करणे किंवा अगदी अतर्क्य
वाटणाऱ्या गोष्टींना मूर्त स्वरूप देणे. यात ब्राऊन यांचा हातखंडा असा कि,
तुम्हाला अगदी बेसावध क्षणी त्याचं कथानक जाळ्यात पकडतं. तुम्ही कथेच्या
प्रवाहाबरोबर जात असताना तुम्हाला अचानक एका तीव्र वळणावर ते वळवतात. दोन गाड्या
अतिशय वेगाने एकमेकींशी स्पर्धा करत असतील आणि अचानक एक तीव्र वळण आल्यास कशा
जोरात आवाज करतील तशी अवस्था आपल्या वाचकांची होते. बरं यात त्यांचा नायक आहे एक
प्रतिकशास्त्रज्ञ. सामान्यतः या शाखेचा अभ्यासाबद्दल सामान्य माणसास तेवढी माहिती
नसते. ब्राऊन यांच्या लेखणीतून मात्र हे शास्त्र मनोरंजक वाटू लागतं. अर्थात खऱ्या
जीवनात त्यांच्या पुस्तकातील प्रतिकशास्त्रातील काही माहितीविषयी आक्षेप घेतले
आहेत. पण वाचक म्हणून त्यांच्या लेखणीने तुमचा ताबा घेण्यास मात्र त्यांनी
वापरलेल्या प्रतिकशास्त्राच्या माहितीचा(?) नक्कीच उपयोग होतो.
तसेच या कादंबऱ्यांमध्ये वावरणाऱ्या
स्त्रियासुद्धा तेवढ्याच बुद्धिमान दाखवल्या आहेत हि एक जमेची बाजू. स्त्रिया केवळ
रती सुखासाठी गूढ कादंबऱ्यांमध्ये वापरण्यापेक्षा त्यांच्या व्यक्तित्वाचे इतर
पैलू लोकांसमोर आणण्याचे प्रयत्न नक्कीच सुखावह. त्यामुळे द दा विन्सी कोड मधील
सोफी, इन्फर्नो मधील सिएंना आणि डॉ. सियेन्स्की या महिला लक्षात राहतात. स्त्री
म्हणून समाजात वावरताना कमावलेलं धारिष्ट्य या व्यक्तिरेखांमधून ठळकपणे जाणवतात.
अगदी डॉ. सियेन्स्की हे पात्र तर थेट डब्ल्यू.एच.ओ. या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या
प्रमुखपदी विराजमान दाखवली आहे. माझ्या दृष्टीने स्त्रियांचा हा सन्मानच म्हणायला
हवा. त्याबद्दल ब्राऊन यांना वंदन.
त्याचबरोबर जाणवतो तो म्हणजे सशक्त असा
बुद्धिमान खलनायक. खलनायाकाशिवाय नायकास झळाळी कशी येणार म्हणा? आणि जेवढा सशक्त
आणि थेट आंतरराष्ट्रीय खलनायक म्हणजे आपल्या नायकाला वाचकांमध्ये उत्तुंग
प्रसिद्धी. अर्थात खलनायकाची बाजूसुद्धा लोकांसमोर येण्याचा थोडा का होईना पण
आणण्याचा लेखक प्रयत्न करतात. पण याचबरोबर रॉबर्ट हा दुधखुळा नायकही नाही. राजकारण
समजू शकणारा तो हुशार मनुष्य आहे. त्यामुळे त्यांच्यातील संघर्ष हा बावळटपणाचा
वाटत नाही.
एकंदर त्यांच्या पुस्तकातून घेण्यासारखं बराच
काही आहे. ज्या गोष्टींविषयी वाद आहेत त्यांच्याविषयी आपण चर्चा केलेली नाही आणि
ती चर्चा विद्वानांनी केलेलीच बरी. आपण इतके मोठे नक्कीच नाही. पण एक वाचक म्हणून
तुम्हा सर्वांना ज्यांना गूढ कथा आवडतात त्यांनी डॅन ब्राऊन यांची पुस्तके नक्की
वाचावीत अशी आहेत. या पुस्तकातून माणूस, त्याचं मन आणि त्याची अमर्याद शक्ती
अधोरेखित होते. मनाच्या शक्तीचा सुयोग्य वापर व्हावा असा संदेशही आपल्याला मिळतो.
आणि हाच संदेश आपण सर्वांनी मनात रुजवणं आणि आपल्या आयुष्यात वापरणं महत्वाचं आहे.
आणि आपण हे करू शकलो तर त्यांच्या लेखनाचं सार्थक झालं असं मानूया. धन्यवाद.
Comments