डॉ. कलाम यांच्याविषयी माझ्या भावना

माणूस जन्मास येतो. माणूस एके दिवशी मरून जातो. माणसाचं आयुष्य हे असं दोन वाक्यांत सुरु करून संपवता हि येतं. आणि हे केवळ मला, तुम्हालाच नाही तर प्रत्येकास लागू पडतं. कारण जन्माला येणे आणि देहावसान होणे अजूनतरी कोणत्याही सजीवास चुकलेले नाही आणि नजीकच्या काळात तशी शक्यताही नाही.
पण काही माणसे मात्र एवढी कर्तुत्ववान असतात कि या दोन वाक्यात कितीही वाक्ये लिहिली तरीही ती अपुरी वाटावीत. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या देहावसानानंतर याची खात्री पटते. डॉ.कलम यांच्या निधनाने सर्व भारतीयांवर शोककळा पसरली. प्रत्येक जण आपापल्या परीने त्यांना श्रद्धांजली वाहू लागला. सोशल नेट्वर्किंग साईट्स वरून आणि इतर माध्यमातून याचा प्रत्यय कोणासही यावा. पण या सर्व जणांमध्ये एकानेही त्यांच्याविषयी अनुद्गार काढल्याचे दिसत नाहीत. उलट त्यांच्याविषयी वाटणारे प्रेम सर्वत्र दिसते. प्रत्येक जण आपापल्या परीने त्यांना आपल्या मनात साठवू पाहताना दिसला.
भारताला शस्त्रसुसज्ज बनवण्यात डॉ.कलामांनी सिंहाचा वाटा उचलला. अहिंसावादी होते तरीही शस्त्र आणि देशाच्या संरक्षणासाठीचे त्याचे महत्व त्यांनी ओळखले होते. अर्थात सर्व काही त्यांच्या मनाप्रमाणे झाले असेही नाही. त्यांनासुद्धा अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी हार मानली नाही. परिणामतः त्यांना यश हे मिळालेच. त्यांच्या याच कर्तुत्वानपणामुळे आपणाजवळ शत्रूंना भय वाटावी अशी शस्त्रे आहेत. असे वर्तमानकाळात वावरणारे विज्ञाननिष्ठ असले तरीही धार्मिक विचारांचा पगडाहि त्यांच्यावर होता.
शांतीप्रिय आणि सज्जन माणूस म्हणून त्यांची प्रतिमा त्यांच्या सरत्या वयाबरोबर उजळच होत गेली. अगदी राष्ट्रपती असतानाही त्यांची साधी वागणूक सर्वसामान्यांना भुरळ पाडत असे. राष्ट्रपती भवनातून निघाल्यानंतरही यात बदल झाला नाही. किंबहुना आधी करत असलेली सर्व समाजोपयोगी कामे ते करतच राहिले.
आयुष्यात घ्याव्या लागलेल्या कष्टामुळे त्यांच्या विचारशैलीत, वागण्यात समंजसपणा होता. त्यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटत. नुकतेच एक पुस्तक वाचनात आले. त्यात कलाम यांनी विद्यार्थ्यांना किंवा सर्वसामान्यांना पडलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. या पुस्तकासाठी त्यांना येणाऱ्या इ-मेल्स आणि इतर संदेशांचा वापर केला आहे. प्रश्न्तोतरांच्या स्वरूपातील पुस्तकामुळे वाचकास त्यातील महत्वाचे मुद्दे व्यवस्थित समजून येतात. तसेच त्यातील बरेचसे प्रश्न आपलेच आहेत कि काय असे वाटते. आणि त्या प्रश्नांना डॉ.कलाम यांनी दिलेली समर्पक उत्तरे मनाचं समाधान करतात. या पुस्तकात त्यांनी वैज्ञानिक आणि धार्मिक विचारांचा उत्तम मेळ घातला आहे. सहसा न दिसणारे विज्ञान आणि धार्मिकतेचे एकत्र नांदणे या पुस्तकात दिसते. अर्थात मी हे एका पुस्तकाविषयी म्हणालो. त्यांची इतर पुस्तके माझ्या वाचनात नाहीत परंतु तीही समाजोपयोगी असणार यात शंका नाही.

तर अशा या उत्तुंग व्यक्तीविषयी माझे ज्ञान हे आजही तोकडे आहे हे नम्रपणे मी नमूद करू इच्छितो. त्यामुळे या लेखाची मर्यादा हि इतकीच आहे. या पेक्षाही अभ्यासू लेख नक्कीच उपलब्ध असतील यात शंका नाही. पण तरीही माझ्या मर्यादा माहित असूनही डॉ. कलामांविषयी मनातील भावना व्यक्त करण्याचा हा प्रयत्न. धन्यवाद.

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे

RESPONSIBLE MINDSET

करोना काल की छह सिंखे (मेरा पहला हिंदी ब्लॉग)