चुंबक : प्रेक्षकपसंती खेचून घेणारा चित्रपट !!

ही ब्लॉग पोस्ट लिहीत असताना, मराठी चित्रपटांनी कोविड काळातलं पुनरागमन दणक्यात केलं आहे. एवढं की, पावनखिंड या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ही जवळपास सात ते आठ राज्यांत या सिनेमाचं प्रदर्शन होऊ घातलं आहे अस कळतं. एका अर्थाने सीमोल्लंघनच आहे ते ! त्याआधी आलेल्या पांघरूण, झिम्मा यांनीही जबरदस्त कामगिरी केली आहेच. मुळातच आशयघनता हा आपल्या मराठी चित्रपटांचा गाभा राहिला आहे. तो आजही तसाच टिकून आहे.तसेच आज त्यास अपेक्षित अशी लोकप्रियता आणि प्रसिद्धी ही मिळते आहे. अर्थात काळासोबत त्यात अनेक उत्तम गोष्टींची भर ही पडत गेली आहेच. त्यामुळे असे हे आशयघन चित्रपट आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ही मोठ्या प्रमाणात नावाजले जात आहेत. 

याच मांदियाळीतील एक चित्रपट म्हणजे 'चुंबक' होय. लोकप्रिय गीतकार स्वानंद किरकिरे आणि उदयोन्मुख कलाकार साहिल जाधव यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेला हा चित्रपट ! खरं तर या सिनेमाचा ट्रेलर मी बऱ्यापैकी आधी बघितला होता. पण आज बघू, उद्या बघू करून हा चित्रपट बघणं पुढे पुढे जात होतं. शेवटी एके दिवशी वेळ मिळाला आणि म्हंटलं आज बघूनच टाकू ! खरं सांगतो अपेक्षेपेक्षा हा चित्रपट खूप काही देऊन गेला. कारण ट्रेलर बघून, थोडी कल्पना आलेली होतीच. पण पूर्ण चित्रपट बघून त्यातील छोट्या छोट्या बारकाव्यांमधून बराच मोठा आनंद देऊन जातो हे अनुभवता आलं. या चित्रपटाची एक जमेची बाजू म्हणजे कुठेही न रेंगाळता पण तरीही स्वतःचा वेग राखत हा चित्रपट पुढे सरकत राहतो. प्रत्येक पात्र कथेच्या गरजेनुसार त्यात येतं आणि सहज निघून ही जातं. संग्राम देसाई याने अभिनित केलेली, डिस्को ही व्यक्तिरेखा त्यातलीच म्हणायला हवी. साहिल जाधवच्या, 'भालचंद्र' उर्फ 'बाळू'चा हा जवळचा मित्र होय. स्ट्रीट स्मार्ट, चलाख म्हणावी अशी ही व्यक्तिरेखा !लॉटरीच्या त्यांच्या कथित 'बिझनेस'ची पायाभरणी करणारा हा डिस्को. कथेच्या अगदी सुरुवातीपासून त्याचा वावर असतो आणि तो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जातो. पण जिथे गरज असेल तिथेच त्याचं पडदयावर दिसणं होतं. एरवी फोन वरील संवादातून तो भेटत राहतो. तीच बाब , विभावरी देशपांडे यांनी अभिनित केलेल्या, 'मनाली' या व्यक्तिरेखेची ! ही व्यक्तिरेखा दाखल झाल्यापासून त्यांच्या आवाजातून आपण त्यांना भेटतो आणि शेवटच्या काही क्षणांत त्या प्रत्यक्ष आपल्याला दिसतात. पण तरीही त्यांची व्यक्तिरेखा कथेत स्वतःच महत्व अधोरेखित करण्यात यशस्वी होते. अन्य कलाकारांनी ही आपापल्या भूमिकांमध्ये रंग भरले आहेतच. अर्थात वर उल्लेख केल्याप्रमाणे, मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या स्वानंदजी आणि साहिल यांचा वावर हा पूर्णवेळ असतो आणि आवडून ही जातो. दोघांनीही आपापल्या व्यक्तिरेखा अगदी मनापासून साकार केल्या आहेत हे कळून येतं. त्यात बाळूचा आणि प्रसन्न (स्वानंद यांची व्यक्तिरेखा) यांच्यातील प्रामाणिकपणा हा सामायिक स्वभाव हे दोघेही उत्तमरीत्या दाखवून देतात. तसेच त्यांच्या सीन्स मधून एक सहजता दिसून येते, जी आवडून ही जाते. यातील आवडून जाणारी अजून एक गोष्ट म्हणजे या दोघांची केमिस्ट्री होय. खासकरून बाळूच्या गावातील या दोघांचा एकत्र भांडण्याचा सिन लक्षात राहतो. घरातून रागावून बाहेर पडलेला बाळू, भूक लागलेला प्रसन्न यांच्यातलं हे भांडण पुढे एका स्थानिक पोस्टर वर राग काढून जातं. इथे वाचायला साधं वाटतं, पण ज्यांनी हा चित्रपट बघितला आहे त्यांना यामागील गंमत नक्की कळेल. तसं इथेही सगळं सांगता येईल पण मग तुम्ही जेव्हा हा चित्रपट बघाल तेव्हा त्यातील मजा राहणार नाही. हा आणि असे अनेक सीन्स या चित्रपटाला सुंदर अनुभव बनवून जातात. अर्थात यामागे सशक्त कथा, तेवढेच संयुक्तीत संवाद, डोकेबाज दिग्दर्शन आणि जिवंत अभिनय या सगळ्यांचा हातभार असतो. त्यामुळे कुठलाही आव न आणता ही साधेपणाने सादर केलेला हा चित्रपट संपल्यावर ही कायम लक्षात राहतो. किंबहुना त्याविषयी लिहायला भाग पाडतो. 

आज बऱ्याच काळाने हा ब्लॉग लिहिला याचं कारण हा उत्तम सिनेमाच आहे. हा सिनेमा आपल्याला 'SonyLiv' या ओटीटी प्लॅटफॉर्म वर बघता येतो. बाकीचे ही अनेक उत्तमोत्तम सिनेमे, वेब शोज आपल्याला या प्लॅटफॉर्मवर बघता येतात. मी ही बघितले आहेतच. त्यातील 'चुंबक' ही माझ्या पाहण्यात आलेली सर्वोत्तम कलाकृती होती असं वाटतं. अर्थात अजूनही बऱ्याच कलाकृती बघणं बाकी आहे. त्यामुळे आजतागायतच्या माझ्या अनुभवावर आधारलेलं हे माझं वैयक्तिक मत आहे ही बाब मी इथे नमूद करू इच्छितो ! असो. आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर तसं नक्की कळवा. तसेच माझ्या लिखाणात काही बदल सुचवावेसे वाटत असतील तर तसेही सांगा !! धन्यवाद !!!

चित्र सौजन्य : इंटरनेट !

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे

RESPONSIBLE MINDSET

करोना काल की छह सिंखे (मेरा पहला हिंदी ब्लॉग)