मला भेटलेली खास व्यक्तिमत्त्वं - ब्लॉग पहिला - राहुल आरेकर.
राहुल आरेकर. आपल्या पैकी अनेकांना परिचित अपरिचित असं नाव. अपरिचित या साठी कारण हा कोणी मोठा सेलिब्रिटी नाही. पण परिचित यासाठी कारण गेल्या नऊ वर्षांत याचे विचार कधी ना कधी तरी आपल्याला स्पर्शून गेलेले असतात. अगदी आपल्या न कळत. पण त्याचे विचार आपल्याला पटतात हे नक्की.
तो आम्हा मित्रांसोबत कीर्ती कॉलेजमध्ये शिकला. ही वेळ आपल्याकडे फेसबुक चा उदय होण्याची. आम्ही सगळे फेसबुकचा वापर वेळ घालवण्यासाठी करायचो. त्यावेळी या पठ्ठ्याच्या लक्षात आलं की फेसबुक चं पेज तयार करता येईल. इथपर्यंत आम्हीही विचार केला होता. पण कृती केली नाही. इथेच राहुलचं वेगळेपण अधोरेखित करावंसं वाटतं. या फेसबुक पेजच्या माध्यमांतून कमाई करता येते हे त्याने ओळखलं. आमच्या डोक्यात एवढा विचारही नव्हता. पण आज जेव्हा डिजिटल मार्केटिंग चं प्रस्थ एवढं वाढलेलं असताना त्याच्या दूरदृष्टीची कल्पना यावी.
पण त्याचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. त्याचं पहिलं पेज त्याला काही कारणांमुळे बंद करावं लागलं. अर्थात आपल्याकडे एक म्हण आहेच, "अपयश ही यशाची पहिली पायरी असते". कारण यामुळे खचून न जाता त्याने त्याचं दुसरं पेज सुरू केलं आणि म्हणून मी वर उल्लेख केला की त्याचे विचार गेल्या नऊ वर्षांत आपल्याला स्पर्शून गेलेले असतील. कारण हे पेज आहे, "आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात". आपल्या पैकी अनेक जण या फेसबुक पेजला फॉलो करत असाल. तेव्हा athavan.rahul असं दिसतं असेल. त्यातला राहुल तो हाच आमचा मित्र, राहुल आरेकर.
आमचा मित्र म्हणण्याचं कारण, राहुलचा मित्र परिवार प्रचंड मोठा. अनेक वेळेस साहेब बाहेर जातात आणि वेगवेगळी माणसं आपल्याला फोटोत दिसतात. फेसबुक वर लाईक्स कमावताना माणसं कमावण आणि त्यांना जपणं त्याने सोडलेलं नाही. मी त्याच्यासाठी काही लेख लिहिले आहेत. ते प्रसिद्ध करताना माझं नाव त्यात दिलं जावं हे त्यानेच सुचवलं,मी काही बोलण्याअगोदर. एवढंच नव्हे तर माझे लेख आवडले म्हणून पठ्ठ्याने मला एक घड्याळही भेटवस्तू म्हणून दिलं. हे सगळं न मागता, न विचारता त्याने केलं. मला खात्री आहे की त्याच्या अनेक मित्रांचे असे अनेक किस्से असतील.जसा हा मित्रांचा मित्र तसाच सामाजिक कार्यातही पूढे. मध्यंतरी एकदा कॉल केला तेव्हा त्याने कॉल उचलला नाही. सहसा असं होत नाही. काही वेळाने मी पुन्हा कॉल केला. तर मी गंमतीने म्हंटलं की काय साहेब , बिझी झालात. तर त्याचं उत्तर आलं, अरे एक ओळखीचे काका आहेत त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलो होतो. काहि फॉर्म्स भरून पाहिजे होतो त्याची धांदल होती. मीच खजील झालो. थोडंस बोलून मी फोन ठेवला. पण त्याला मनातल्या मनात सलाम केला. कारण आज सोशल मीडिया च्या माध्यमातून त्याने पैसे कमावले आहेतच. सेलिब्रिटीज त्याला ओळखतात. पण तरीही त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. महत्वाची व्यक्ती ओळखते आणि पैसे आले म्हणून त्याच्या डोक्यात हवा गेलेली नाही.
पण म्हणून तो व्यावहारिक नाही असं नाही. व्यावहारिक पण तरीही सहृदयी असं हे उमदं व्यक्तिमत्व. नऊ वर्ष आपल्याला खूप वाटत असतीलही, पण मला नक्की खात्री आहे येत्या काळात पुढची खूप दशकं हा माणूस स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे येईल आणि उत्तम व्यावसायिक म्हणून नावारूपास येईल. एक मित्र म्हणून आणि हितचिंतक म्हणून त्याला माझ्याकडून त्याच्या या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा ! देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो !! 😊
- विघ्नेश खळे

Comments
मराठी दिनाच्या शुभेच्छा 👇
https://aradhya1976.blogspot.com/2022/02/blog-post_26.html