टाटांविषयी वाचलेले अजून एक उत्तम पुस्तक – द रोमान्स ऑफ टाटा स्टील

काही दिवसांपासून ‘द रोमान्स ऑफ टाटा स्टील’ हे पुस्तक वाचतो आहे. या आधी गिरीश कुबेर यांचं ‘टाटायन’ वाचलं होतंच. पण आता आर. एम. लाला यांचं हे पुस्तक वाचनात आल्याने टाटा स्टील या कंपनीच्या जन्माआधीपासून ते आजपर्यंतचा प्रवास बारकाईने वाचता आला आहे. जमशेटजी टाटा या भारतीय उद्योग विश्वाच्या भीष्मपितामहांनी हि कंपनी उभारण्याचे स्वप्न पहिले आणि आपल्या अलौकिक प्रयत्नांनी कंपनी वास्तवात आणण्यात यश मिळवले. अलौकिक म्हणण्याचे कारण असे कि स्वातंत्र्यपूर्व काळात अशी स्वप्ने बघणे आणि ते हि एका भारतीयाने हे दुरापास्तच होते. पण तरीही त्यांनी हे स्वप्न पहिले. त्याचा कित्येक वर्षे सतत पाठपुरावा केला. 

तरुणपणी इंग्लंडला असताना एका व्याख्यानात पोलाद उद्योग एखाद्या देशास पुढील काळात प्रगतीशील बनवू शकतो अशा आशयाचे व्याख्यान ऐकले. तेव्हापासून आपले इतर उद्योग खासरून कापड गिरण्या सांभाळत त्यांनी पोलाद उद्योगाची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. लक्षात घ्या तो कालखंड. आज आपल्याला काही क्लिक्स वर सर्व माहिती उपलब्ध असते. त्या काळी त्यांना तशी सुविधा न्हवती. तरीही जीवाचं रान आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांनी माहिती मिळवली. इतकी कि त्यांच्या जवळ आपण भारतात पोलाद उद्योग उभा करू शकू असे मानसिक बळ निर्माण झाले. इतर उद्योगातून आलेली धनसंपत्ती आणि दर्जेदार उद्योगसमूह अशी ओळख निर्माण झाली होतीच. पण म्हणून कष्ट वाचले आहेत म्हणावं तर नाही. हे पुस्तक वाचताना लक्षात येतं कि अनेक ठिकाणी कारखाना काढण्यासाठी अनेक तासांचा प्रवास करून त्यांना जावं लागे. ती ठिकाणे पण अशी कि जिथे शहरी माणसांना राहणे मुश्कील वाटावे. कारण बहुतेक भाग डोंगराळ किंवा जंगलाचा. आदिवासी पाड्यांचा. त्यात औषधे वगैरेंचा प्रसार न झालेला. त्यामुळे रोगराई मुबलक. अशा दिव्य परिस्थितीत टाटा आणि त्यांचे सहकारी प्रवास करत आणि राहत.

बघायला गेलं तर त्यांना काय गरज होती एवढं सगळं करण्याची ? पण उद्योजकता आणि राष्ट्रभक्ती त्यांच्या नसानसात भिनल्यामुळे असेल पण त्यांनी या परिस्थितीशी झगडा दिला. आणि उशिरा का होईना पण त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले. पण नियतीचा खेळ कुणास चुकला. जमशेटजी हा प्रकल्प पूर्ण होण्याअगोदर परदेशात निवर्तले. पण काम थांबवणे अशक्य होते आणि जमाशेटजींनासुद्धा ते आवडले नसते. त्यामुळे काम चालूच राहिले.

टाटा उद्योग समूह केवळ कारखाना उभारून थांबले नाहीत. त्यांनी तेथे एक नगर वसवण्याची योजनाच हाती घेतली होती. अर्थात जमशेटजी हयात असतानाच याची आखणी झाली होती. आणि त्यांच्या नंतरही ती व्यवस्थित अमलांत आणली गेली. अशा प्रकारे हा प्रकल्प मार्गी लागला. आणि याचे महत्व लवकरच सर्वांना कळून आले. कारण पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना इजिप्त-आफ्रिका भागातील लढायांसाठी जी साधने लागत ती टाटा यांच्या याच कारखान्यातून पुरवली जात. त्याचं महत्व इतकं कि युद्ध संपत असताना त्या वेळेच वॉइसरॉय यांनी या कारखान्यास भेट दिली, आणि टाटांच्या सन्मानाप्रित्यर्थ त्या जागेस नाव दिलं जमशेदपूर. जमशेटजींच्या अफाट कर्तुत्वाला त्यांनी सलामच या कृतीतून केला. या नंतरहि हा कारखाना आणि टाटा यांचं काम सुरूच राहिलं. त्याविषयी पुस्तकामध्ये सविस्तर वाचायला मिळेलच.

खरं तर टाटा या घराण्याविषयी आणि त्यांच्या उद्योगांविषयी बोलू तेवढं कमीच. केवळ लक्ष्मिलोलूप न राहता देशाच्या कल्याणासाठी हे अख्खं कुटुंब (समूहासकट) झटलं. अनेक नामवंत संस्था त्यांनी उभ्या केल्या. वेळ प्रसंगी दगदग सहन करून परदेश दौरे करून देशासाठी अनेक प्रकल्प तडीस नेले. आणि हे सर्व करत असताना आपलं नाव कुठेहि झळकू नये याची त्यांनी काळजी घेतली. पण अर्थात सूर्याचा प्रकाश हा सर्वव्यापी असतो. आपण आपल्या डोळ्यांवर हात ठेवला तर तेवढाच अंधार होतो, पण म्हणून सूर्य झाकोळला जात नाही. त्याचं तेज सर्वदूर पसरतं आणि त्याची दखल सर्वच घेतात. आजकालच्या काळात चवली पावलीच्या बदल्यात लोक स्वतः पाठ थोपटून घेतात. त्यामुळे टाटांचं वेगळे पण सतत अधोरेखित होतं.
तर अशा या जबरदस्त व्यक्तिमत्वांची ओळख करून घेण्यासाठी वर उल्लेखलेली पुस्तके नक्की वाचा

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे

RESPONSIBLE MINDSET

करोना काल की छह सिंखे (मेरा पहला हिंदी ब्लॉग)