‘आगे कि सोच’
![]() |
| Aage ki soch |
पाठच्या गाडीवाल्याला एका वाक्यात बऱ्याच गोष्टींचा विचार करायला लावणारा हा टॅक्सीवाला. त्याच्या हुशारीचं कौतुक वाटलं आणि गंमत म्हणून हा फोटो काढला. पण खरं तर मंडळी, हा संदेश आपण सर्वांनीच गंभीरतेने घेणं नक्कीच गरजेचं आहे याची सर्वांना कल्पना आहेच.
गेल्या काही दिवसापूर्वी वॉरेन बफे यांच्या तत्वज्ञानाविषयी एक पुस्तक वाचण्यात आलं. ‘ताओ ऑफ वॉरेन बफे’ असं त्या पुस्तकाचं नाव. वॉरेन बफे यांच्या पूर्वाश्रमीच्या सुनबाई आणि एका विद्यार्थ्याने हे पुस्तक लिहिलं आहे. यात वॉरेन बफे यांचे पैसे कसे कमवावेत, गुंतवावेत आणि संचय कसा करावा याचे तत्वज्ञान आहे. यातील बरेचसे मुद्दे हे केवळ पैशांना लागू न होता आपल्या आयुष्यालाही लागू होतात. आणि बफे हे आर्थिकदृष्ट्या आणि संस्कारांनीही किती श्रीमंत आहेत याची खात्री पटते.
आज आपण सर्वांनीही वॉरेन यांच्यासारखे आचार विचार अवलंबणे महत्वाचे आहे हे नक्की. कारण वॉरेन यांचे हे बहुमूल्य विचार एक सर्वोत्तम समाज निर्मितीसाठी आणि आर्थिक सधनता मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत. आणि ते तसे आहेत कारण ते दीर्घकालीन आहेत. ‘आगे कि सोच’ त्यात आहे. आणि काळाच्या पुढे विचार करणारी माणसे नेहमीच वंदनीय असतात.
आज इतिहासात पाठी वळून पाहिलं तर वॉरेन यांच्यासारखी दीर्घकालीन आचार विचार असलेली माणसे स्वतःचे आणि इतरांचेही आयुष्य घडवताना दिसतात. आणि अनेक दशके आणि शतके लक्षात राहतात.
मध्यंतरी डिस्कवरीवर अमेरिकेच्या चार मोठ्या उद्योगपतींवर एक डॉक्युमेंटरी केली होती. त्यात तेल उद्योगातील सर्वोच्च नाव असलेले रॉकफेलर, जे.पी. मॉर्गन यांचाही समावेश होता. या चारही उद्योगपतींनी आपापल्या काळात दूरदृष्टी दाखवली. ‘आगे कि सोच’ ठेवली. आणि अमेरिकेच्या सधनतेचा पाया रचला. कारण त्यांनी बॅंक, रेल्वेमार्ग, इंधनाचे क्षेत्र अमेरिकी वर्चस्वाखाली आणले. आज अमेरिकेच्या दबदब्याची पाळेमुळे यात आहेत. वित्तीय क्षेत्र, वाहतुकीची संसाधने आणि उद्योग चालवण्यासाठी लागणारी इंधने तसेच इतर क्षेत्र यांमध्ये त्यांनी लक्षणीय प्रगती केली. इतर प्रगत देशही फार पाठी न्हवते. पण या सर्व ठिकाणी ते होऊ शकले ते दूरदृष्टीमुळे.
आपल्या इथे दूरदृष्टी असलेली माणसे आधीही होती, आजही आहेत आणि यापुढेही असतील. केवळ उद्योग क्षेत्रात नाही तर प्रत्येक क्षेत्रात ती आहेत. आपल्याला गरज आहे ते अशा माणसांना नेतृत्व मिळवून देण्याची. आणि तेही बिनविरोध. अर्थात सर्व गोष्टी बिनविरोध होणं हे अशक्य आणि दिवास्वप्न आहे. पण विरोध हा केवळ विरोधासाठी न होता मुद्देसूद असावा. त्यासाठी आपल्या आजूबाजूची परिस्थिती फारशी स्पृहणीय नाही. पण अगदीच वाईट आहे असेही नाही. गरज आहे ते सामान्य माणसाने या अशा व्यक्तींना नेतृत्व देण्याची.
कारण स्वतंत्र होऊनही आजही आपण मुलभूत गरजांसाठी लढतो आहोत.
मुंबईसारख्या शहरांचं एकवेळ ठीक आहे. पण बाकीच्या महाराष्ट्राचं आणि भारताचं काय ? आजही कित्येक जण मुलभूत गरजा मिळवण्यासाठी धडपडत आहेत. डॉ. प्रकाश आमटे याच्या विषयी वाचन करून आपल्याला हे कळत. त्यांनी आदिवासींसाठी केलेला संघर्ष आपल्या डोळ्यात पाणी आणतो आणि अंतर्मुख करतो. अशा व्यक्तींना माध्यमातून प्रसिद्धी मिळते तेव्हा बर वाटतं. आणि यापुढेही हे असं सतत होत राहील अशी आशा आहे. पण त्याचबरोबर आपण आपला उद्योग क्षेत्राविषयीचा विचारसुद्धा बदलणं आवश्यक आहे. अनेक वेळा सर्वसामान्यांकडून उद्योगपती म्हणजे चोर असे बोलले जाते. काही जण तसे असतातही. पण टाटा, अजीज प्रेमजी यांची उदाहरणे सुद्धा आपल्या समोर आहेत हे विसरता येणार नाहीत. तसेच कोणत्याही देशात विकास होण्यासाठी सर्व नागरिकांना अर्थार्जनाचं साधन मिळणं महत्वाचं आहे. आणि हे उद्योगपती, व्यावसायिक, गुंतवणूकदार यांच्यामुळे शक्य होते. सुदैवाने हळू हळू का होईना आपल्याला याची जाणीव होते आहे. पण अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी आपण ‘आगे कि सोच’ ठेवणार कि भूतकाळातील विचारसरणींना कवटाळून बसणार हा प्रश्न आहे.
शेवटी मंडळी आगे कि सोच म्हणजे काय तर उज्ज्वल भविष्य डोळ्यासमोर ठेऊन केलेली वर्तमानाची मांडणी. आपल्याकडून ती होत आहे आणि यापुढेही सतत होईल अशी अपेक्षा करूया आणि सध्या इथे स्वल्पविराम घेऊयात. माझे विचार कसे वाटले हे कळवायला विसरू नका. धन्यवाद.

Comments